Nursery Business
Nursery Business Agrowon
यशोगाथा

दुर्गम, डोंगराळ भागात यशस्वी ‘नर्सरी’ व्यवसाय

अशोक भोईर, डॉ. विलास जाधव

पालघर हा आदिवासी शेतकऱ्यांचा जिल्हा आहे. जिल्ह्यातील विक्रमगड हा डोंगराळ व दुर्गम तालुका आहे. तालुक्यातील ओंदे गावात हेमंत व सानिका हे ठाकरे दांपत्य राहते. त्यांची सात एकर शेती असून त्यात भात (Paddy), आंबा (Mango) व जोडीला दुग्ध व्यवसाय (Dairy Business) केला जातो. मात्र कुटुंबाचे अर्थकारण उंचावण्यासाठी एवढे पुरेसे नव्हते. त्यामुळे या दांपत्याने रोपवाटिका व्यवसाय (Nursery Business) सुरू केला. तो सहा वर्षांपासून चिकाटी व जिद्दीने चालवला. आज जिल्ह्यात त्यांनी आपल्या व्यवसाय गुणवत्तेतून ओळख तयार केली आहे.

सुरुवातीचे प्रयत्न

सानिका यांच्या माहेरी शेती हाच मुख्य व्यवसाय होता. छोटासा तबेलाही होता. त्यांची आई टेलरिंग व्यवसाय करायची. सानिका यांनी नजीकच्या विद्यालयातून दोन वर्षांचा कृषी पदविकेचा अभ्यासक्रम पर्ण केला. स्वत:चा शेतीविषयक व्यवसाय करण्याची त्यांची इच्छा होती. परंतु वडिलांची इच्छेनुसार शासनाच्या उमेद प्रकल्पामध्ये प्रकल्प सहायक या पदी त्या नोकरी करू लागल्या. ओंदे येथील हेमंत ठाकरे यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. हेमंत पूर्णवेळ शेतीच करतात. ठाकरे दांपत्याने उत्पन्नवाढीसाठी स्वत:ची रोपवाटिका सुरू केली. परंतु त्यात अपेक्षित यश मिळत नव्हते.

प्रशिक्षणानंतचा व्यवसाय

कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल येथे सरकारच्या भारतीय कृषी कौशल्य परिषदेतर्फे ‘नर्सरी वर्कर’ या विषयातील एक महिन्याचे मोफत प्रशिक्षण घेण्याची संधी सानिका यांना मिळाली. त्यामध्ये या विषयातील तज्ज्ञ अशोक भोईर यांनी कलमांचे विविध प्रकार, रोपांची निगा, व्यवस्थापन, प्रो ट्रेमध्ये भाजीपाला रोपे तयार करणे आदींविषयी प्रशिक्षित केले. उत्तम सहाणे, अनुजा दिवटे व केंद्र प्रमुख डॉ. विलास जाधव यांचेही मार्गदर्शन लाभले. काही रोपवाटिकांना भेटी देण्यात आल्या. त्यातून आत्मविश्‍वास वाढल्याने इथूनच शास्त्रीयदृष्ट्या सानिका यांनी नव्या उमेदीने व जोशाने व्यवसायास सुरुवात केली.

व्यवसायातील यश

व्यवसायातील सातत्य, गुणवत्ता टिकवणे व बाजारपेठेतील मागणी ओळखून त्यानुसार पिकांची निवड यामुळे सानिका यांच्याकडील रोपांना हळूहळू मागणी येऊ लागली. भातकाढणी झाल्यावर या भागात भाजीपाला हंगाम सुरू होतो. त्या दृष्टीने वांगी, टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, कारले आदींची रोपे तयार केली जातात. हंगामात सुमारे तीन लाखांपर्यंत भाजीपाला रोपे तयार होतात. या भागात मोगऱ्याचे पीक मुख्य आहे. त्याची मागणीही शेतकरी व काही स्वयंसेवी संस्थाकडून सुरू असते. त्याचीही सुमारे एक लाखांपर्यंत रोपे तयार केली जातात. शिवाय मागणीनुसार झेंडू व गुलाबाची रोपेही तयार केली जातात.
मागील वर्षी ठाकरे यांनी मोगऱ्याच्या (छाट कलम) सुमारे ७० हजार रोपांची यशस्वी विक्री केली. प्रति रोप किंमत १० रुपये आहे. मागील वर्षी पावसाचा फटका बसला होता. मात्र दरवर्षी सुमारे ८० हजार ते एक लाखांपर्यंत त्याची रोपे तयार होतात. तर भाजीपाल्यामध्ये मिरचीची सुमारे ९८ हजार, टोमॅटो ५२ हजार, कोबी व फ्लॉवर प्रत्येकी २० हजारांपर्यंत रोपनिर्मिती केली. प्रति ट्रे पीकनिहाय १३० ते १५० रुपयांपर्यंत त्यांच्या किमती आहेत. या भागात कांदाही घेतला जात असल्याने प्रथमच त्याची सुमारे दोन लाख रोपे तयार केली.

व्यवसायाचे वैशिष्ट

सानिका सांगतात, की आमच्या भागात बाहेरूनही रोपे विक्रीस येतात. पण याच वातावरणात वाढविलेली आमची रोपे असल्याने शेतकऱ्यांकडून त्यास पहिली पसंती असते. शिवाय शेतकऱ्यांना प्रत्यक्ष जागेवर येऊन खात्री करता येते. या भागात आमची भाजीपाल्याची एकमेव नर्सरी आहे. विक्रीपश्‍चातही कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी आम्ही तत्पर असतो. वर्षाला सुमारे नऊ ते १० लाख रुपयांची उलाढाल करण्यापर्यंत मजल मारली आहे. याच व्यवसायामुळे कुटुंबाला मजबूत आर्थिक आधार मिळाला आहे. सहा लाखांचे नवे शेडनेट नुकतेच त्यामुळे घेता आले. शोभिवंत झाडांसह भाजीपाला रोपवाटिका व्यवसायाचा आता अजून विस्तार करायचा आहे, असेही सानिका यांनी सांगितले.

संपर्क ः सानिका ठाकरे, ८७६७५०२४३३

(लेखक कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, जि. पालघर येथे कार्यरत आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pre Monsoon Precautions : मॉन्सूनपूर्व सर्व कामे यंत्रणांनी वेळेत पूर्ण करावीत

Agriculture Fertilizer : खतांचे दोन लाख २० हजार टन आवंटन जिल्ह्यासाठी मंजूर

Illegal Seeds : सीमावर्ती भागात बेकायदा बियाणे गुणनियंत्रणच्या रडारवर

Pre-Kharif Review Meeting : गावनिहाय पीक उत्पादन आराखडे वेळेत तयार करावेत

Agriculture Cultivation : रत्नागिरीत लागवडीखालील क्षेत्र ४ हजार हेक्टरने घटले

SCROLL FOR NEXT